वर्ग: 12 वा. विषय मराठी

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा.*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
वर्ग:१२वा.         विषय: मराठी.
         
      📖गद्यपाठ 8 वा.📖

           *रेशीमबंध*
       डॉ. यु. म. पठाण (1930)

       *लेखक परिचय*
👉सुप्रसिद्ध साहित्यिक, संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक संपादक व नामवंत वक्ते.
👉'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित; 'ज्ञानोबा-तुकाराम ' या पुरस्कारानेही महाराष्ट्र शासनाकडून सन्मान.
👉 'मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप' या विषयावर संशोधन. 👉👉 मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन-आवडीचा प्रांत.
👉 मराठवाड्यातील विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध
👉 1990 साली पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
👉 *संपादित ग्रंथ*
1. भाऊसाहेबांची बखर
2.मराठवाड्यातील लोककथा
3.महानुभाव साहित्य संशोधन:खंड 1.

👉 *लेखसंग्रह*
1.संतसाहित्य चिंतन
2.शोधणी
3. आठव ज्ञानदेवाचा...ज्ञानदेवीचा

    *पाठपरिचय*
पाठाचे स्वरूप- ललितगद्य.

_उत्तररात्र (मध्यरात्रीनंतरचा प्रहर)_ 
            ⏬
         _पहाट_ 
             ⏬
        _सकाळ_ 
    👉या छोट्याशा कालचक्राचे तितक्याच ओघवत्या,लालित्यपूर्ण शैलीत वर्णन.
👉उत्तरात्रीपासून पहाटेपर्यंत नीरव शांतता, निद्रिस्त भवताल; पहाटेनंतर सकाळी वृक्ष वेली, पाखरांना हलकेच येणारी जाग यांचे शब्दचित्र मनाला उल्हासित करते.
👉 वृक्ष, वेली, फुलें, पाखरे,यांच्याबद्दल आत्मिक ओढ- त्यांच्याबरोबर युगानुयुगाचे नाते आहे असे लेखकाला वाटते.
👉 या नात्यालाच *रेशीमबंध* असे नाव.
👉 पाखरे आणि पहाट एकमेकांना भेटायला उत्सुक.
👉 पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत-सडा निशिगंधाच्या सुगंधाची उधळण, अशा पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रसन्न सकाळचे तितक्याच प्रसन्न शैलीत चित्रण.

     ➡️पाठ्यमुद्दे⬅️
🌒 *उत्तररात्रीचे आगमन*
       मध्यरात्रीनंतर आकाशात उत्तररात्री आगमन होते. उत्तररात्रीच्या आगमनातील हे हळुवारपण, अलगदपणा, मुलायमता; तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं लेखकाला स्पष्टपणे जाणवतात. लेखकाचही मन या उत्तररात्रीशी एकरूप झालं आहे.
      लेखक या नीरव एकांतात डायनिंग टेबलच्या खिडकीतुन बाहेर पाहतो. काळ्या कुळकुळीत दाटलेल्या अंधारातून जणू साऱ्या झाडांना, वेलींना देखील डोळा लागलेला आहे. पाखरं आपापल्या घरट्यात निद्राधीन आहेत. पहाटेचे आताशी तीन साडेतीन वाजलेले आहेत.
     लेखकाला ही वेळ फार आवडते. सारं जग साखरझोपेत असतं. साऱ्या चिंता-काळज्या मिटलेल्या अवस्थेत माणसाचं मन समेवर आलेलं असतं. सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले हेच ते आपलं खरं मन. सगळी सृष्टी या वेळी गाढ निद्रेत असते. उत्तररात्री असलेली हीच नीरव शांतता लेखकाला खुप भावते.

🌒 *लेखकाचे 'रेशीमबंध'*
      लेखकाच्या घरासमोरील सायली, बोगनवेल, गुलमोहर, जॅक्रांडा, घाणेरी, चाफा, हे सगळं लेखकाला लुभावत,खुणावत, त्याचे मन आकर्षित करून घेत. लेखक विचार करतो की या सगळ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? कोणते रेशीमबंध आहेत? युगानुयुगांपासून मानवाला निसर्गाची ओढ  या आदिम, ऋजु स्नेहबंधामुळे तर नाही? लेखकाचं मन निसर्गातील या प्रत्येक घटकाचा शोध घेत. उत्तररात्रीनंतर यांना कधी एकदा जाग येते याची आस लावून बसतं.

🌒 *अलविषा- लेखकाची नात: उत्तररात्रीचे प्रतिक*
     अलविषा-लेखकाची मुलगी अलमास ची लहान मुलगी. अलमास माहेरी आली की अलविषाही तिच्याबरोबर येते. नेहमी लेखकाच्या अंगाखांद्यावर खेळणारी अलविषा लेखकाची खुप लाडकी आहे. उत्तररात्री नीरव शांततेत लेखकाला तिची आठवण येते. तिच्या जवळ जाऊन पाहिले तर अलविषा आईला बिलगून झोपलेली आहे. तिचे निरागस शैशव लेखकाला बाहेर असलेल्या निरागस, नीरव शांततेसारखे भासते.उत्तररात्रीची निरावता आणि अलविषाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात कमालीचं आश्चर्यकारक साम्य असलेलं लेखकाला जाणवतं. निसर्ग आणि मानवातील हे नातं देखील आदिम आहे; निसर्ग आणि माणूस दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार पाकळीपाकळीगत लेखकाला उलगडू लागतो.

     🌒 *पहाट व पाखरं*  
            *यांच्यातील नाते*
       पहाटे सर्वात आधी जाग येते ती बागेतल्या पाखरांना. पहाटेचे नि बागेतल्या पाखरांचे देखील असेच रेशीमबंध आहेत, जवळकीच नातं आहे.पाखरांचे पंख फडफडल्याशिवाय पाहत आकाशात येत नाही. पाखरं गुलमोहराचा घरट्यातून, जॅक्रांडाच्या फांद्यातून डोळे किलकिले करून जणू विचारतात, 'पहाट झाली काय?' खरं तर पहाटच विचारत असते, 'मी येऊ का तुम्हाला भेटायला?'  पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती अगदी हुळूवार, गंधवार्ताही लागू न देता आकाशात पाऊल टाकते. पहाटेच आगमन लेखकासाठीही एक अनोखा, नाजूक, लोभासवाणा, तरल अनुभव वाटतो.
        हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच बागेतील विविध झाडांवरची पाखरं आपापसात कुजबुज लागतात. सुरुवातीला मंद असणारा चिवचिवाट जसजशी पाहत उजाडते तसतसा वाढत जातो, एखादया उत्सवासारखा. पाखरांच्या त्या आल्हादाला, हर्षोल्हासाला एक अनावर भरती येते.हा चिवचिवाट ऐकून सायली  जागी होते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात. क्रोटंस हलू-डोलू लागतात. जॅक्रांडाही पहाट वाऱ्यासंगे हसू-बोलू लागतो. पाहत झाल्याचा हा आनंद निसर्गातील प्रत्येक घटक जणू साजरा करतो.

       🌒 *लेखकाची पहाट*
            हळूच डोकावणाऱ्या पहाटेच्या किरणांत लेखकाला बागेत वृक्ष आणि फुलांचं विलोभनीय दर्शन होतं. त्या सर्वांबद्दल एक अनिवार ओढ लागून राहते. पहाटेच्या किरणांनीं न्हाऊन निघालेला मोगरा, सायलीच्या इवल्या इवल्या पानांतून वाहणारी हिरवाई, गुलमोहराने स्वागतासाठी शिंप सडा या सर्वांचे कलात्मक दर्शन लेखकाला होते. जॅक्रांडाची नळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पागोष्टी करीत असल्याचा भास होतो. चाफा, निशिगंध, मोगरा, या फुलांच्या सुगंधाचा मोह लेखकाला आवरत नाही. त्या प्रत्येकाच्या सुगंधाचं वेगळेपणही लेखकाला स्पष्टपणे जाणवत राहतं. बागेतील या फुलांशी, झाडांशी, एकरुप होता होता सकाळच्या प्रकाशाची सूर्यकिरण डोकावू लागतात.


     🌒 *सकाळचं आगमन*
         एव्हाना सकाळची कोवळी सूर्यकिरणे डोकावू लागतात. सारं काही लख्ख आणि प्रकाशमान! या उजेडात लेखकाच्या लक्षात येते, वाफे कोरडेच आहेत. नळाला पाईप लावून लेखक बागेतील वाफ्यात , कुंड्यांत चाफा, गुलमोहर, जॅक्रांडा, सायली, बोगनवेल यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर तारारणारी, हसणारी, टवटवीत दिसणारी झाडांची पानं अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच! आदल्या दिवशी चुकून पाणी घालायचं राहून गेलेला मोगरा जणू रुसून बसतो नि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटे गोंडस कळ्यांच्या रूपानं जणू आपल्याकडे पाहून खुदुखुडू हसतो. अबोला सोडून सुगंधाची पखरण करू लागतो. लेखक म्हणतात, 'इवली इवली झाडं नि वेली देखील किती भावूक असतात!' लहान मुलांप्रमाणेच या रुसलेल्या झाडावेलींवर प्रेम केले, त्यांच्यावरून मायेने हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला विरंगुळा देतात.

        लेखक म्हणतात, तुकोबांनी वृक्ष आणि वेलींना आपला सोयरा म्हटलं आहे. त्यांच्यातील आणि आपल्यातील हे नातं, हे रेशीमबंध आदिम असावेत, युगानुयुगाचे असावेत. त्याशिवाय आपल्याला त्यांची नि त्यांना आपली एवढी अनिवार ओढ का लागली असती?
-------------------------------
   📝 *प्रा.चंद्रशेखर हासे*
सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा, ता: अकोले, जि: अहमदनगर.
8275921761.
-------------------------------

Comments