*शालेय जीवनातील आठवणी*

🌾 शाळेतील आठवणी🌾

      1. ...आणि दप्तर मिळाले!
       _____________________
         तसा शाळेत असताना मी कमालीचा विसराळू. मला ओळखणारे, माझे जवळचे मित्र, अरुण जाधव, शांताराम मधे, अशोक संगारे, मच्छिंद्र घोडके, पोपट देशमुख, अरुण देशमुख, ज्योत्स्ना, इंदिरा, (माझ्या भाऊबंद.😃) , संदीप मालुंजकर या सर्वांना माझ्यातील या न्यूनत्त्वाचा चांगलाच परिचय होता.

पाचवी, सहावी आणि सातवीपर्यंत मी रुंभोडीला (दत्तवाडीला) मामांकडे राहायचो. शेतातली सगळी 'मज्जा' उपभोगत मी शाळेत यायचो. मामी मला रोज जेवणाचा डबा द्यायची. वर्गातील सगळे ग्रुपने जेवण करायचे; कधी वर्गातच, तर कधी नदीच्या काठावरील बागेत. जेवण झाल्यावर डबा कसाबसा बेंचपर्यत जायचा, पण घरी तो क्वचितच जायचा. बहुतेक तो नेहमीच वर्गात विसरायचा. त्यामुळे दररोज जेवण कशात द्यायचे असा रास्त प्रश्न मामीला पडायचा. मामा आणि आजी खूप बोलायचे. अनेक वेळा मार देखील.....

अर्थात ते तरी काय करणार? नंतर मला फडक्यात जेवण द्यायला लागले, तर फडक्याचीही तीच तऱ्हा! कधीच फडके घरी जाईना. घरचे माझ्या या विसराळू पणाला अक्षरशः वैतागून गेलेले.

बरं, गोष्ट फक्त डब्यापुरती मर्यादित नव्हती, पेन, पुस्तक, वही, दप्तर..... हो, अगदी अख्खं दप्तरसुद्धा विसरलोय मी!

पाचवीच्या वर्गात होतो आपण. तुकडी क. आमचा वर्ग विठ्ठल मंदिराशेजारी कोठवळांच्या माडीवर भरत असे. माडीच्या खालच्या मजल्यावर सहावीचा वर्ग भरत असे. शाळेच्या मैदानापासून वर्ग बराच लांब असल्यामुळे आणि सगळ्यात उंच असल्यामुळे आम्ही तसे पहिल्यापासून 'दुर्लक्षितच'! शेवटच्या तासिका पीटी, कार्यानुभव वगैरे असायच्या. पीटी च्या तासाला खाली ग्राऊंडवर रांगेत यायचे असा सरांनी निरोप पाठवला. शेवटचा तास असल्यामुळे आम्ही सगळे रांगेत आपापली दप्तर घेऊन ग्राऊंडवर निघालो. शाळा सुटल्यावर तसेच रुंभोडित उतरून घरी पळायचे हे नेहमीचेच नियोजन.

ग्राऊंडवर जातांना मंदिरासमोरील सातवीचे वर्ग लागायचे. त्यापुढे मोकळ्या जागेत तीन टपऱ्या होत्या आणि शेजारी कोपऱ्यावर रुकारी यांचे हॉटेल होते. 

रांगेतून जातांना माझे लक्ष त्या हॉटेलकडे गेले; माझ्या लक्षात आले की आपल्याला तहान लागली आहे. मी हॉटेलमध्ये गेलो, पाणी पिलो अन् रांग पुढे जायचा आधी रांगेत येऊन चालू लागलो. 

सर्वजण ग्राऊंडवर आलो. नेहमीप्रमाणे सर्वांनी आपापली दप्तरे झेंड्याच्या शेजारी निलगिरीच्या झाडांच्या आळ्यात ठेवली, आणि खेळू लागलो. तास संपला. शाळा सुटण्याची बेल झाली, अन् सगळेजण दप्तराच्या दिशेने धावले. त्या घोळक्यात अर्थात मीही धावलो. ज्याची आपल्या दप्तराशी गाठ पडली, तो वाघाची शिकार केल्याच्या आनंदात घराच्या दिशेने धावत सुटला. माझे दप्तर दिसेना म्हणून मी जरा मागेच राहून वाट पाहिली. सगळ्यांनी आपापली दप्तरे उचलली अन् निघून गेले, पण माझे दप्तर न मिळाल्यामुळे मी एकटाच मागे राहिलो. दप्तर कुठे गेले तेच कळेना. कुणी नेले म्हणावं तर असे कधीच घडले नव्हते. 

माझा चेहरा एव्हाना रडवेला झाला होता. कुणाला सांगावं, काय करावं तेच कळेनासं झालं. दप्तर गेल्याच्या दुःखापेक्षा ही पुढच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, जे अधिक भीतीदायक होतं. 

तितक्यात ऑफिसमधून डगळे मामा (शिपाई) येताना दिसले. जीवाच्या आकांताने त्यांना हाक मारली. ते बहुदा वर्ग बंद करण्याच्या घाईत असावेत. त्यांच्याकडे गेलो. त्यांना दप्तर हरवल्याचे सांगितले. त्यांनी थोडावेळ विचार केला, आणि म्हटले,' नेले असेल कुणीतरी तुझी गम्मत म्हणून.'

मी रडकुंडीला येऊन म्हटले, 'नाही मामा, तसे कुणी नेणार नाही.' त्यावर ते म्हणाले, 'तु वर्गातून आणले होते का?' 
 "हो, वर्गातून निघतांना तर मी दप्तर बरोबर घेऊन निघालो होतो, पण....." मी डोकं खाजवत पुटपुलो. पण तरीही दप्तर कुठे गेले किंवा काय झाले हेच मला कळेना.

 माझा रडवेला चेहरा पाहून डगळे मामांना कदाचित माझी दया आली असावी. ते मला म्हणाले, "चल, आपण वर्गात जाऊन पाहून येऊ." 

आम्ही परत इतक्या लांब, वर्गात गेलो. बिचाऱ्या मामांना माझ्यामुळे इतका त्रास झाला. पण मी तरी काय करणार. वर्गात जाऊन पाहणे हा एकच आशेचा किरण माझ्यासमोर होता. नाहीतर दप्तर जर मिळाले नाही तर संध्याकाळी घरी यथेच्छ धुलाई होणार हे नक्की. वर्षभराचे (एकच) पेन, कंपास,  शिवाय ज्या ज्या विषयांच्या वह्या, पुस्तके हरवली जातील ती कशी मिळणार? त्या संबंधित शिक्षकांचे बोलणे, मार तो वेगळाच! दप्तर शोधायला मामांच्या मागोमाग जातांना हे सगळे विचार मनात येत होते. मामांनी वर्ग उघडला पण दप्तर काही मिळाले नाही. कसे मिळणार? ते तिथे नव्हतेच.

मला अधिकच रडू फुटलं. शर्टाच्या कॉलरला नाक पुसत 
फुंदत फुंदत रुंभोडी गावातून मी घरी दत्तवाडीला जायला निघालो.

घराकडे निघालो होतो, पण पुढच्या संकटाचे विचार मनात येताच मी अधिकच अस्वस्थ झालो......

एरवी दप्तर हरवल्याचे एखाद दोन दिवस मी लपऊ शकलो असतो. पण ......
मी दररोज घरी गेल्यानंतर जनावरांना पेंड, सुग्रास घालण्याचे काम माझ्याकडे होते. आज घरी जायला तब्बल दीड तास उशीर झाला होता. त्यामुळे आज जनावरे उपाशीच होती. घरी गेल्या गेल्या आपणावर प्रश्नांची सरबत्ती होणार, उशीर का झाला हे विचारले जाणार, आणि आपले बिग फुटणार हे निश्चित होते. त्यामुळे माझी अवस्था 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला, त्यात विंचू चावला......' अशी झाली होती. विचारांच्या तंद्रीत मी घरी पोहचलो. सुग्रास भिजायला घालताच अपेक्षेप्रमाणे मामा, आजीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आजीने मला येताना पाहिले होते. तीने अगदी वर्मावर च बोट ठेवले, अन् दप्तर कुठंय असं विचारलं. मी वेळ मारून नेली, म्हटलं, 'संदीपच्या घरी गेलो होतो येतांना, तिथेच उशीर झाला. दप्तरही तिथेच ठेवले आहे.'  त्या दिवशी काही अधिक चौकशी झाली नाही.

तो दिवस गेला. संध्याकाळी घरातील कंदील लावले अन् घरातील सगळी माणसं गप्पा मारायला बसली. (त्या वेळी मामांच्या घरी वीज नव्हती.) मला एकच धाकधूक होती,माझ्या अभ्यासाचा विषय निघाला तर काय करायचे? धाकटे मामा सतत अभ्यासाची विचारपूस करायचे, त्याप्रमाणे आजही केली तर? त्यामुळे मी आज जरा आडबाजूला अंधारातच बसलो होतो.

तितक्यात प्रवीण (मामांचा मुलगा) आला आणि त्याने माझ्याकडे पेन मागितला. कुठून देणार पेन मी त्याला? अन् नाही म्हणावं तर अभ्यास अन् दप्तराची चर्चा निघणार, जी मला मुळीच नको होती. मी कसाबसा विषय बदलला अन् त्यालाच अभ्यास करण्यापासून परावृत्त केले. त्याला बोलण्यात गुंतवून वेळ मारून नेली. 

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो खरा पण कीर्तनाला गेल्यासारखे. माझ्याकडे वही, पुस्तक पेन, कंपास काहीच नव्हते. शिक्षक शिकवत होते. सर्वजण लिहीत वाचत होते, मी मात्र धरून आणल्यासारखा (मागच्या बाकावर) बसलो होतो. दप्तर चोरीला गेल्याचे दुःख, घरचा धाक, अन् वर्गातील अपराधीपणाची भावना.... मी पुरता भांबावलो होतो. काय करावे तेच कळत नव्हते. दप्तर नेमके कुठे गेले, कुणी नेले, परत मिळेल का, नाही मिळाले तर काय करायचे, वर्षभर वह्या पुस्तके कुठून आणायच्या, अभ्यास कसा करायचा, असे एक ना अनेक प्रश्न मला सतावत होते. वर्गात बसलो होतो पण 'धड देवळात, अन् चित्त चपलात' अशी अवस्था होती. कशातच मन लागत नव्हतं. कुणाला सांगायला,  कुणाचा आधार घ्यायला, मदत घ्यायला तितकं जवळचं ही कुणी नव्हतं. मित्र होते, पण पाचवीच्याच वर्गातील ते. माझ्या समस्येचं गांभीर्य कुणाला कळेल?

दोन दिवस बिनादप्तरचे असेच गेले. नाही म्हणायला अजून घरी गोष्टीचे बिंग फुटले नव्हते, त्यामुळे बरे होते.

 दोन दिवसांनी साळवे मॅडम (आमच्या वर्गशिक्षिका) पहिल्या तासाला वर्गात आल्या. येताना त्यांच्या हातात अनपेक्षितपणे माझी दप्तराचे पिशवी दिसली. खताच्या गोनीची शिवलेली ती 'स्कूलबॅग' पाहताक्षणीच माझा मूड बदलला. दोन दिवस अनेक विचारांचे ओझे घेऊन असणारा मी पूर्णपणे 'रीलिव्हड' झालो, एका क्षणात!


स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला मला. मी बेंचवरून उठून मॅडमकडे धावलो. दप्तर कुणाचे हे विचारायची संधीसुद्धा मी त्यांना दिली नाही. दप्तर अक्षरशः त्यांच्या हातातून हिसकावून घेतले, कधी त्यांच्याकडे पहात तर कधी दप्तरकडे.....

थोड्या वेळाने भानावर आलो. मग तितक्याच घाईने त्यांना विचारले, "मॅडम, कुठे सापडले तुम्हाला हे दप्तर?"
मॅडम म्हटल्या, "अरे आत्ता वर्गात येताना हॉटेल वाले रूकारी काकांनी आवाज दिला आणि हे दप्तर पाचवीच्या कुणा चंद्रशेखर हासेचे आहे, ते दोन दिवसापासून इथेच आहे. ते घेऊन जा, म्हणून माझ्याकडे दिले. दोन दिवसांपासून तिथेच होते, कुणी न्यायला येईना म्हणून तिथेच पडले होते. शेवटी त्यांनीच त्यातील वह्या उचकल्या आणि त्यातून नाव शोधले व दप्तर माझ्याकडे दिले." 

एका क्षणात मला त्या दिवशीचा घटनाक्रम आठवला. रांगेत मैदानावर जातांना तहान लागली म्हणून पाणी प्यायला मी हॉटेलमध्ये गेलो. ग्लासात पाणी घेण्यासाठी मी बखोटीचे दप्तर खाली ठेवलं. घाईत पाणी ढोसले, अन् मागे राहिलो तर सर हाणतील या भीतीने दप्तर तिथेच ठेऊन पळालो अन् रांगेत मैदानावर गेलो. आपण दप्तर विसरलो आहोत, आणि ते हॉटेलमध्ये विसरलोय हे मी सपशेल विसरलो. विचारांच्या कडीतली एक कडी माझ्या स्मृतींतून पूर्णपणे गायब झाली होती. ती आत्ता जोडली गेली.

मला खूप आनंद झाला. पण हा आनंद दप्तर मिळाल्याच्या आनंदा बरोबरच अनेक समस्या संपल्याचाही होता.

       ✨✨✨✨✨

Comments

  1. Replies
    1. खूप,खूप छान!👌 जुन्या आठवणींत घेऊन गेलास
      शाळेचे दिवस आठवले, रांगेत खाली ग्राउंडवर जाणे,,👌😊

      Delete
  2. छानच सरजी! तुमच्या आठवणी खरोखर आठवणीत ठेवण्याजोग्या

    ReplyDelete
  3. पुन्हा एकदा जुन्या आठ्वणी च्या विश्वात रम्य ते बालपण शेखर सर मस्त लिहित जा शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment